बंगळूरू – क्रेडअव्हेन्यू, ओकेक्रेडीट, प्लम, नोव्हा बेनिफिटस्, स्विगी, बायजूज अशा नव्या युगातील तंत्रज्ञानावर आधारीत कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी लवचिक कामाच्या वेळा देऊ केल्या आहेत. करोनामुळे शाळा व पाळणाघरे बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांसमोर मुलांच्या संगोपनाचा आणि त्यांना कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाल्याने कंपन्यांनी यासाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत. पाळणाघराच्या शुल्काचा परतावा, मातृत्व आणि पितृत्व रजांमध्ये वाढ यांचा त्यामध्ये समावेश आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे भारतातील बुद्धीमत्तेच्या सर्वात मोठ्या संघटीत क्षेत्रातील कंपन्यांमध्ये घरून काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. डिजिटल पद्धतीने बुककीपिंगचे काम करणाऱ्या ओकेक्रेडीट या स्टर्टअप कंपनीने या क्षेत्रातील सर्वसाधारण निकषांच्या बाहेर जाऊन मातृत्व आणि पितृत्व कालावधीतील सवलतींमध्ये वाढ केलेली आहे. आता कंपनीतील अपत्यप्राप्ती झालेल्या महिलेला 32 आठवड्यांची पगारी रजा मिळणार आहे. नेहमीच्या नियमांपेक्षा कंपनीने सहा आठवड्यांची पगारी रजा जास्त दिली आहे. पितृत्व रजाही आठ आठवडे एवढी पगारी मिळणार असून असा पित्याला 28 आठवडे घरून काम करता येणार आहे.
या नव्या पालकांच्या कामाच्या ठिकाणच्या टीममध्येही अतिशय लवचिकता आहे आणि मुलांसाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे सहकाऱ्यांनाही समजलेले आहे. ओकेक्रेडीट कंपनीनेही नुकतीच अमर्याद रजा धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना पाहिजे तेवढी रजा घेता येते. क्रेडअव्हेन्यू कंपनीने सरकारी नियमानुसार 26 आठवड्यांची पगारी मातृत्व रजा आणि आणखी 26 आठवड्यांची अर्धपगारी रजा देऊ केली आहे. नवअपत्याच्या पित्याला 10 आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे. ही सुट्टी ते वर्षभरात तीन टप्प्यात घेऊ शकणार आहेत. त्याचबरोबर कंपनीने पाळणाघर शुल्क परतावा योजना राबवली आहे. त्यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन मुलांसाठी महिन्याला 15 हजार रुपयांचा परतावा मिळणार आहे.
भाजीपाला विक्रीच्या क्षेत्रातील स्टार्टअप प्लम कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळा लवचिक ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर मानसिक आरोग्यासाठीच्या सुविधाही देऊ केल्या आहेत. नोव्हा बेनिफिटस्, स्विगी, बायजूज अशा कंपन्यांनी देखील पालकांसाठी विविध सवलती देऊ केल्या आहेत.