अचलपूर: राज्यभरात शनिवारी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाजारांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. अनेकांनी जयंतीच औचित्य साधून खरेदी केली. हेच औचित्य साधून विदर्भात एक अनोखा विवाह पार पडला. सरपंच आणि उपसरपंच यांनी शिवजयंती दिनी लग्नगाठ बांधली.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कांडली गावात हा विवाह सोहळा पार पाडला आहे. कांडली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांनी एकमेकांशी विवाह केला आहे.
गावातील सरपंच आणि उपसरपंच अशाप्रकारे विवाहबंधनात अडकल्याने संपूर्ण जिल्ह्यात या लग्नाची चर्चा सुरू आहे. सविता आहाके आणि दिलीप धंडारे असं विवाह बंधनात अडकणाऱ्या सरपंच आणि उपसरपंचाचं नाव आहेत.
सरपंच सविता आहाके आणि दिलीप धंडारे मागील एक वर्षापासून कांडली ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच म्हणून एकत्रित काम करत होते. मात्र त्यांच्या विवाह बंधनाच्या निर्णयाने कांडली ग्रामपंचायतवर पती पत्नीची एकहाती सत्ता निर्माण झाली आहे. या अनोख्या लग्नाला कांडली गावातील नागरिकांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत.