- झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पुनर्विकासाच्या कामांना चालना मिळणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणालाही एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाईड डीसी रूल्स) लागू झाली आहे. या नियमावलीमुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या कामांना चालना मिळणार आहे.
संपूर्ण राज्यासाठी युनिफाइड डीसी रूल्स राज्य सरकारने जाहीर केले. सुरुवातीला या नियमावलीतून प्राधिकरणाला वगळण्यात आले होते. मात्र, आता प्राधिकरणासाठी देखील ही नियमावली लागू केली आहे. या नियमावलीबाबत नागरिकांच्या काही हरकती, सूचना असल्यास महिनाभराच्या आत त्या दाखल करता येणार आहे. पुणे नगररचना विभागीय सहसंचालक यांच्या कार्यालयात या हरकती, सूचना देता येतील. त्यावर सुनावणी होऊन राज्य सरकारकडे त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, युनिफाईड डीसी रूल्सबाबतची माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ प्राधिकरण कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
युनिफाइड डीसी रूल्सनुसार 20 हजार चौरस मीटर आणि त्यापुढील क्षेत्रासाठी 5 टक्के सुविधा जागा (ऍमिनिटी स्पेस) सोडावी लागणार आहे. यापूर्वी 4 ते 10 हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी 5 टक्के तर, 10 हजार चौरस मीटरपेक्षा आधिक क्षेत्रासाठी 10 टक्के ऍमिनिटी स्पेस सोडावी लागत होती. सोसायट्यांतील अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी अस्तित्त्वातील बिल्टअप एरियाच्या 30 टक्के अतिरिक्त एफएसआय किंवा प्रति सदनिका 15 चौरस मीटर इतके क्षेत्र यापैकी जे जास्त असेल तितके वाढवून मिळणार आहे. 12 मीटर रस्त्याला सन्मुख असलेल्या भूखंडासाठी जास्तीत जास्त 3 एफएसआय, 18 मीटर रस्त्यासाठी 4 तर, 27 मीटर रस्त्याला सन्मुख असलेल्या भूखंडासाठी जास्तीत जास्त 5 एफएसआय मिळणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पुर्वी 3 चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर होता. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. आता 4 एफएसआय लागू होणार आहे.