पुणे (लोणीकाळभोर) – शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर परिसरात बुधवारी ( दि. २) सकाळी घडली . या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, रुपेश कांबळे (सर्व रा. लोणीकाळभोर ) ही मरण पावलेल्या चौघा कामगारांची नावे आहेत. सेफ्टी टँकमधील गॅसमुळे गुदमरून या चौघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोणी काळभोरमधील येथील हॉटेल प्यासाच्या परिसरात ही घडली.
या भागातीली एका घराच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी घरमालकाने या कामगारांना सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बोलवले होते. सफाई चालली असताना बारा फूट खोल असलेल्या टाकीमध्ये हे चौघेजण एकापाठोपाठ पडले. टाकीत गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हा प्रकार लक्षात आल्यावर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना व अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यानुसार, केंद्र अधिकारी विजय महाजन , नितीन माने, विकास पालवे, मुस्तक तडवी, मयूर गोसावी या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सलग तासाभराच्या परिश्रमानंतर या जवानांनी चौघांचे मृतदेह टाकीतून बाहेर काढले.
हा प्रकार नेमका कसा घडला? व त्याला जबाबदार कोण? कोणाचा निष्काळजीपणा नडला की तांत्रिक चुकीमुळे ही दुर्घटना घडली? याबाबत लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जारी करण्यात आला आहे.