राजगुरूनगर (प्रतिनिधी) – दवाखान्यात उपचारासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागल्याने दुचाकीवरून पडून 6 महिन्याच्या बाळाच्या अंगावरून चाक गेल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजगुरूनगर शहरात गुरुवारी (दि. 22) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
राक्षेवाडी (ता. खेड) येथे राहणारे कैलास चिंतामण आढळ हे त्यांच्या लहान 6 महिन्यांच्या मुलीला गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 ईएफ5752) पत्नी सोबत राजगुरूनगरमध्ये पोखरकर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घेवून जात होते. शहरातील वाडा रस्त्यावर संगम कलेक्शन व शगुन कलेक्शन या कपड्याच्या दुकानाच्यामध्ये वाडा रस्त्याने दुचाकीवरून पुढे जात होते. त्यांच्या मागून एसटी बसस्थानकच्या बाजुकडून वाडा बाजुकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने आढळ यांच्या मोटार सायकलला ओव्हरटेक केले. तो ओव्हरटेक करीत असताना त्याचे ट्रॉलीचा धक्का मोटारसायकलला लागला व अपघात झाला.
अपघातात कैलास आढळ हे डावे बाजुस पडले. त्यांची पत्नी अनिता या सहा महिन्यांच्यामुलीसह उजव्याबाजुला रस्त्यात पडल्या. त्यावेळी चिमुकलीच्या डोक्यावरून टॅक्टरचे चाक गेले. या चिमुकलीला रुग्णवाहिकेद्वारे चांडोली येथील सरकारी दवाखान्यात नेले असता तेथे डॉक्टरांनी चिमुकलेलीचा मृत झाल्याचे सांगितले.
याबाबत मुलीचे वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशीरा पर्यंत खेड पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.