प्योंगयांग, (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या विक्षिप्तपणाची अनेक उदाहरणे यापूर्वी पुढे आली आहेत. आता त्यामध्ये आणखीन एका उदाहरणाची भर पडली आहे. दक्षिण कोरियातील के-पॉप व्हिडीओ बघितल्याबद्दल आणि इतरांमध्ये वितरीत केल्याबद्दल उत्तर कोरियामध्ये 7 जणांना सार्वजनिक ठिकाणी देहदंडाची शिक्षा देण्यात आली आहे, असे वृत्त एका अहवालाच्या आधारे अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी दिले आहे.
दक्षिण कोरियातील के-पॉप व्हिडीओ म्हणजे लबाडीचा कर्करोग आहे. या व्हिडीओंमुळे उत्तर कोरियाचे नागरिक भ्रष्ट बनतील, असे किम जोंग उन यांचे मानणे आहे. त्यामुळेच या व्हिडीओंवर उत्तर कोरियात बंदी घालण्यात आली आहे. हे व्हिडीओ बघितल्यामुळे गेल्या दशकभरात 7 जणांना सार्वजनिक ठिकाणी देहदंड देण्यात आला आहे, असे “ट्रान्झिशनल जस्टीस वर्किंग ग्रुप’ या गटाच्या अहवालात म्हटले आहे.
या संदर्भात 2015 पासून 683 जणांच्या मुलाखतीही या गटाने घेतल्या आहेत. किम यांच्या कारकिर्दीत अशा एकूण 24 जणांना देहदंड दिला गेला आहे. त्यापैकी 6 जणांना 2012 ते 2014 दरम्यान हॅसान प्रांतात देहदंड दिला गेला आहे. देहदंड दिला जात असताना दोषी व्यक्तीच्या नातेवाईकांना उपस्थित राहण्याची सक्तीही केली जात असायची असेही या गटाच्या अहवालात म्हटले आहे.