सिडनी- ऑस्ट्रेलियात बाऊन्सी कॅसलवरून पडल्यामुळे 5 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा बाऊन्सी कॅसल हवेत 10 मीटरपर्यंत उंच उचलला गेला होता. ऑस्ट्रेलियातील तास्मानिया प्रांतात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इतर 4 मुले गंभीर जखमी झाली आहेत.
शैक्षणिक वर्षाच्या सांगतेनिमित्त एका शाळेत आयोजित आनंद महोत्सवादरम्यान ही दुर्घटना घडली. मरण पावलेल्या मुलांमध्ये 2 मुले आणि 2 मुलींचा समावेश आहे. हे सर्व इयत्ता सहावीमध्ये शिकत होते, असे तास्मानिया पोलीस आयुक्त डॅरेन हाईन यांनी सांगितले. आज संध्याकाळी या अपघातात पाचव्या मुलाचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी झालेल्या मुलांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे.
ही मुले जंपिंग कॅसलवरून अंदाजे 10 मीटर उंचीवरून पडली असावीत, असे पोलीस कमांडर डेबी विल्यम्स यांनी सांगितले.