पुणे : नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर शनिवारी इंग्लंडवर विजय मिळवून भारताने पाचव्या अंडर-19 विश्वचषकावर नाव कोरले.
2020 च्या विश्वचषकात अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभव पत्कराल्यानंतर, भारताने यंदा थाटात पुनरागमन करत यंदाच्या विश्वचषकत सर्व सामने जिंकत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.
गट फेरीत दक्षिण आफ्रिकेवर आरामात विजय मिळवून भारताने विजयी मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद आणि इतर चार सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यामुळे ते गट फेरीतील दोन सामन्यांना मुकले. या सर्व संकटांचा सामना करत भारताने बिनधास्तपणे आयर्लंड आणि युगांडा यांना हरवून गटात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बांगलादेशवर संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तर अंतिम फेरीत इंग्लंडला धुळ चारत विजयी पताका फडकवली. यश धुलच्या नेतृत्वाखालील संघाने 2000, 2008, 2012 आणि 2018 च्या विजेत्या संघांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि विक्रमी पाचवा विश्वचषक जिंकला. या पार्श्वभूमीवर अंडर-19 विश्वचषकातील भारताच्या विजेतेपदापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत.
गट फेरी : दक्षिण आफ्रिकेवर 45 धावांनी विजय
गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताची वरची फळी ढासळली होती. भारताने सलामीवीर हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी यांना सहा षटकांत गमावले. मात्र, कर्णधार धुलने सामन्याची सुत्रे हाती घेत 82 धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. आणि भारताचा डाव 232 धावांवर आटोपला.
यानंतर अष्टपैलू राज बावा आणि डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांयना 187 धावांत गुंडाळले. डेवाल्ड ब्रेव्हिसने 65 धावा केल्या. तो दक्षिण आफ्रिकेचा एकमेव लढवय्या खेळाडू होता. ओस्तवालने 28 धावांत 5 बळी तर बावाने 47 धावा देत 4 फलंदाजांची शिकार केली. आणि भारताचा विजय निश्चित केला.
गट फेरी : आयर्लंडवर 174 धावांनी विजय
कर्णधार धुल, उपकर्णधार शेख रशीद, आराध्य यादव, वासू वत्स, मानव पारख आणि सिद्धार्थ यादव यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे भारताला त्यांच्या दुसर्या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला होता.
अष्टपैलू निशांत सिंधूने धुलच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (79) आणि हरनूर (88) यांनी सलामी करताना 164 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनीही आक्रमक फलंदाजी वेगाने धावा जमवल्या. आणि भारताला 50 षटकांत 5 बाद 307 अशी धावसंख्या उभारुन दिली.
या आव्हानाचा बचाव करताना, डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने चौथ्या षटकात आयर्लंडचा सलामीवीर लियाम डोहर्टीला बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. आणि तिथूनच आयर्लंडची पडझड सरु झाली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकू दिले नाही. यामध्ये सर्वच गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले आणि आयर्लंडला 133 धावांवर गुंडाळले.
101 चेंडूत 88 धावा केल्याबद्दल हरनूरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
गट फेरी : युगांडावर 326 धावांनी विजय
आंगक्रिश रघुवंशी आणि राज बावा यांच्या शतकी खेळीमुळे भारताने युगांडा विरुद्धच्या या सामन्यात 326 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. भारताचा हा विजय स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय होता.
ब्रायन लारा स्टेडियमवर प्रथम फलंदाजीला उतरताना, भारताने प्रथम बावा (108 चेंडूत नाबाद 162) आणि सलामीवीर रघुवंशी (120 चेंडूत 144) यांच्या शतकांच्या जोरावर 5 बाद 405 धावा करत यंदाच्या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यानंतर भारताने विरोधी संघाला 19.4 षटकांत केवळ 79 धावांत गुंडाळून एकतर्फी लढतीत सहज विजय मिळवला.
रघुवंशी आणि बावा यांनी तिसर्या गड्यासाठी 206 धावांची भागीदारी करून युगांडाकडून सामना हिरावून घेतला. रघुवंशीने 22 चौकार आणि चार षटकार ठोकल्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता, तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या बावाने 14 चौकार आणि तब्बल 8 षटकारांसह आपला डाव सजवला.
उपांत्यपूर्व फेरी : बांगलादेशवर 5 फलंदाज राखून विजय
कोविड-19 मधून बरे होऊन धुल आणि रशीद परत आल्याने भारतीय संघाला मुठभर मांस अधिक चढले होते. या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर संघर्षपूर्ण विजय मिळवून 2020 अंडर-19 विश्वचषक अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढला. या सामन्यात भारतीय संघाला चांगलेच झुंजवले होते. मात्र, भारताने इथे दाखवून दिले की ते दबावाच्या परिस्थितीवर मात करू शकतात आणि त्यातून मार्ग काढू शकतात. भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंत रवीने भारताला अचूक सुरुवात करून देत, बांग्लादेशची 3 बाद 14 अशी अवस्था केली.
यानंतर फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आणि बांगलादेशला 111 धावांत गुंडाळले. बांगलादेशला 100 धावांचा टप्पाही ओलांडला आला नसता पण 48 चेंडूंत 30 धावा करणार्या एसएम मेहेरोबमुळे बांग्लादेश 111 धावा उभारु शकला.
बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली आणि दुसर्याच षटकात शून्य धावसंख्येवर हरनूरला तंबूत माघारी परतवले. मात्र, दुसरा सलामीवीर रघुवंशीने एका बाजूने किल्ला लढवत उपकर्णधार रशीदसह 70 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर 1 बाद 70 अशी धावसंख्या असताना क्षणात भारत 4 बाद 82 असा कोलमडला. मात्र, या अटीतटीच्या क्षणी कर्णधार धुलने शांत डोक्याने 26 चेंडूत 20 धावांची छान खेळी करत भारताला उपांत्य फेरीत पोहचवले.
उपांत्य फेरी : ऑस्ट्रेलियावर 96 धावांनी विजय
या आव्हानात्मक सामन्यात ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत होती. मात्र, भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत ऑसीजवर सलग पाचवा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचे दोन फलंदाज 13 व्या षटकात 37 धावा करुन माघारी गेले होते.
मात्र कर्णधार धुल आणि उपकर्णधार रशीदने 204 धावांची भागीदारी केल्याने भारतीय संघ सावरला. त्यांनी सावध सरुवात केली, नंतर धावांचा वेग वाढवला.
धुलने पुन्हा दबावाच्या परिस्थितीत 110 धावा ठोकल्या, तर रशीदचे शतक अवघ्या सहा धावांनी हुकले. पुढे तळाच्या फलंदाजांनी अक्रमक फलंदाजी केली. यामध्ये दिनेश बानाने 4 चेंडूत 20 धावा फटकावल्या. यासह भारताने 50 षटकांत 5 बाद 290 आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
मोठ्या सामन्यांमध्ये, पाठलाग करताना नेहमीच अतिरिक्त दबाव असतो. आणि हा दबाव ऑस्ट्रेलिया पेलू शकली नाही. दुसर्याच षटकात सलामीवीर टीग वायली याला रवीने ट्रेडमार्क इनस्विंगरवर पायचीत केले. त्यानंतर कोरी मिलर आणि कर्णधार कूपर कॉनोली यांनी 68 धावांची भागीदारी करून पुढे खेळी केली पण कोविड-19 मधून सावरल्यानंतर पुनरागमन करणार्या सिंधूने 17व्या षटकात ही जोडी फोडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची परिस्थिती 1 बाद 71 वरून 7 बाद 125 अशी झाली. अशात ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज लचलान शॉने 66 चेंडूत 51 धावांची खेळी केली पण ती व्यर्थ ठरली कारण भारताने ऑस्ट्रेलियाला 194 धावांत गुंडाळले आणि सामना 96 धावांनी जिंकला.
धुलला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
…आणि भारताने विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले
सर्वांचे लक्ष भारताच्या फिरकी आक्रमणावर वेगवान गोलंदाजांनीच अंतिम फेरीत भारताचा विजय सुखकर केला. फलंदाजीसाठी उत्तम असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने त्याच्या स्विंग चेंडूंवर पहिल्या चार षटकांत जेकब बेथेल आणि टॉम पर्स्टला माघारी पाठवल्याने भारताची सुरुवात दमदार झाली.
त्यानंतर अष्टपैलू राज बावाने त्याच्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर झटपट बळी मिळवत इंग्लंडची अवस्था 7 बाद 91 अशी केली.
या हत्याकांडाच्या दरम्यान, इंग्लंडचा फलंदाज जेम्स रीवने एकहाती किल्ला लढवत जेम्स सेल्ससह 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून इंग्लंडला सावरले.
यानंतर इंग्लंडचा डाव 44.5 षटकांत 189 धावांवर आटोपला. यामध्ये कारण रवी कुमारने 4 तर राज बावाने पाच बळी पटकावले. यासह अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाच बळी घेणारा राज बावा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्का बसला कारण फॉर्ममध्ये असलेला रघुवंशी डावाच्या दुसर्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. सलामीवीर हरनूर सिंग आणि शेख रशीद यांनी 49 धावांची भागीदारी करत सामन्याचा ताबा घेतला. मात्र, हरनूर 21 धावांवर बाद झाला.
रशीद आणि धुल यांच्यात आणखी एक छोटीशी भागीदारी झाली. रशीद चांगली फलंदाजी करत होता पण एका खराब फटक्यामुळे तो 50 धावा करुन बाद झाला. आणि धुल 17 धावा करुन बाद झाला. भारताची 4 बाद 97 धावा अशी अवघड स्थिती होती. तथापि, निशांत सिंधू आणि बावा यांनी एकत्र येऊन आत्मविश्वासाने खेळून भारताला जवळ नेण्यासाठी 67 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
सिंधूने 54 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या, तर दिनेश बानाने दोन षटकार मारून भारताला थाटात पाचवे विश्वविजेतेपद मिळवून दिले.