पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनामुळे 2200 महिलांच्या पतीचे निधन झाले आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. वैधव्य आलेल्या या महिलांना आधाराची आवश्यकता आहे. तसेच योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडवून आणणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने “उमेद जागर’ हा समुपदेशनाचा उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील वैधव्य आलेल्या महिलांना कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. त्यामध्ये अर्थिक मदत व व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाते. मात्र, बहुतांश वेळा या महिलांपर्यंत त्या योजनांचा लाभ पोहचत नाही. तसेच बऱ्याचशा महिलांना योजनांसाठी लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया माहित नसल्याने त्या यापासून वंचित राहतात. विधवा महिला विविध योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेच्या वतीने उमेद जागर हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत महिलांचे समुपदेशन करणे, विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्यांशी समन्वय साधणे. तसेच कौशल्य विकास वाढीसाठी महिलांना प्रशिक्षण देणे व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नागरवस्ती विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद जागर उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी नागरवस्ती विभागामार्फत करण्यात येणार आहे.