पुणे – भारताचा स्टार खेळाडू साथीयन ज्ञानसेकरन याने रोमहर्षक विजयाची नोंद करून दबंग दिल्ली टीटीसीला इंडियन ऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये बंगळुरू स्मॅशर्सवर 10-5 असा विजय मिळवून दिला. पुण्यातील महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस सीझन 4 मध्ये दबंग दिल्ली टीटीसीच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले.
दबंग दिल्ली टीटीसी संघाकडून खेळणाऱ्या साथीयनने बंगळुरू स्मॅशर्सच्या किरिल गेरासिमेन्कोचा 2-1 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. साथीयनचा आक्रमक खेळ पहायला मिळाला. त्याने पहिल्या सर्व्हपासून जोरदार फटके अन् फोरहॅंडचा सुरेख खेळ केला व पहिला गेम 11-6 असा जिंकला. किरिलने त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये चांगले पुनरागमन करताना 11-4 अशी बाजी मारली. साथीयनने तिसऱ्या गेममध्ये पिछाडीवरून मुसंडी मारून 11-9 अशी बाजी मारली.
अहिका मुखर्जीने नतालिया बाजोरचा 2-1 असा पराभव करून दबंग दिल्ली टीटीसीला आघाडी मिळवून दिली. जागतिक क्रमवारीत 135 व्या क्रमांकावर असलेल्या अहिकाने अचूक फटके मारताना बाजोरला बेजार केले आणि 11-7 असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही तिचे सातत्य पहायला मिळाले. मोक्याच्या क्षणाला अहिका गुणांची झटपट कमाई करताना दिसली आणि तिने हा गेम 11-6 असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये मात्र बंगळुरू स्मॅशर्सच्या खेळाडूने 11-7 अशी बाजी मारली. अहिकाच्या विजयाने दबंग दिल्ली टीटीसीने 4-2 अशी आघाडी घेतली.
बंगळुरू स्मॅशर्सच्या मनिका बात्रा आणि किरिल गेरासिमेन्कोसह मिश्र दुहेरीत साथीयन व बार्बोरा बालाझोव्हा या जोडीचा 2-1 असा पराभव केला. मनिका आणि किरिल या जोडीने दमदार खेळ करताना पहिला गेम 11-4 असा जिंकला. त्यांनी हा गेम 11-6 असा जिंकला, परंतु तिसऱ्या गेममध्ये त्यांना 6-11 अशी हार मानावी लागली. जॉन पेर्सनने पुरुष एकेरीत सनील शेट्टीवर 3-0 असा विजयाची नोंद केली. स्विडीश खेळाडूने वर्चस्व गाजवताना 11-4, 11-7 आणि 11-8 अशी बाजी मारून दबंग दिल्लीची आघाडी 8-4 अशी मजबूत केली.
मनिक बात्रा आणि श्रीजा अकुला यांची महिला एकेरीची लढत बंगळुरू स्मॅशर्ससाठी महत्त्वाची होती, कारण दबंग दिल्लीकडे 8-4 अशी आघाडी होती. मनिकाने पहिला गेम घेतला, परंतु श्रीजा हार मानणाऱ्यांमधली नव्हती. तिने दुसऱ्या गेममध्ये अनुभवी मनिकाला तोडीस तोड टक्कर देताना 7-4 अशी आघाडी मिळवली. पण, मनिकाने 9-9 अशी बरोबरी साधली. मनिकाने 10-9 अशी आघाडी घेत मॅच पॉइंटच्या दिशेने झेप घेतली होती, परंतु श्रीजाने 10-10 अशी बरोबरी साधली अन् नंतर गोल्डन गुण घेत हा गेम 11-10 असा जिंकला. श्रीजाने तिसरा गेम जिंकून 2-1 अशा विजयासह दबंग दिल्लीचा 10-5 असा विजय पक्का केला.
बंगळुरू स्मॅशर्स 5-10 दबंग दिल्ली टीटीसी
किरिल गेरासिमेन्कोसह 1-2 साथीयन ज्ञानसेकरन
(6 -11, 11-4, 9-11)
नतालिया बाजोर 1-2 अहिका मुखर्जी
(7 -11, 6-11, 11-7)
किरिल / मनिका 2-1 साथीयन/बार्बोरा
(11-4, 11-9, 6-11)
सनील शेट्टी 0-3 जॉन पेर्सन (4 -11, 11-7, 8-11)
मनिका बात्रा 1-2 श्रीजा अकुला
(11-9, 10-11, 9-11).