वडगाव मावळ – शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी आयुक्तालयाने सुरू केलेल्या व्हॉट्सप व्हॉट्सप आधारित तक्रार निवारण उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत दोन हजार जणांनी संपर्क साधला आहे, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
सामान्य शेतकऱ्यालाही त्यांची अडचण थेट कृषी आयुक्तालयाकडे सहज मांडता येणारी यंत्रणा तयार करावी, याकरिता कृषी आयुक्तालयात “कृषी तक्रार व्हॉट्सप हेल्पलाइन’ तयार करण्यात आली आहे. त्यासाठी 9822446655 या भ्रमणध्वनी क्रमांक राज्यभर खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सात दिवस 24 तास सुरू असलेल्या या हेल्पलाइनचे संनियंत्रण राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रदीप देशमुख व्यक्तीशः करीत आहेत. ते तक्रारी स्वीकारत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
व्हॉटस्ऍप हेल्पलाइन सुरू झाल्याचे समजताच हेल्पलाइनला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पहिल्या 24 तासात 500 जणांनी हेल्पलाइनशी संपर्क साधला. निविष्ठांसह डीबीटी, अवजार अनुदान, पाणंद रस्ते, वीज, आरोग्य अशा समस्याही शेतकऱ्यांनी सांगितल्या. चार दिवसांत या हेल्पलाइनवर किमान दोन हजार जणांनी संपर्क साधला आहे.
दरम्यान, या हेल्पलाइनवर आता निविष्ठा सोडून अन्य तक्रारीही येऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी फक्त बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत तक्रार असल्यास व्हॉट्सपवर लेखी तक्रार करणे अपेक्षित आहे.तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, समस्या किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील साध्या कागदावर लिहावा. या कागदाचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ऍप हेल्पलाइनवर पाठवावे, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे.
तोंडी तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा
व्हॉट्सप हेल्पलाइन क्रमांक संभाषणासाठी किंवा इतर तक्रारींसाठी नाही. कृषीविषयक अन्य तक्रारींसाठी किंवा संभाषणासाठी 18002334000 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, कृषी आयुक्तालयाच्या तक्रार निवारण कक्षातील 8446117500, 8446221750 किंवा 8446331750 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर तोंडी तक्रारदेखील करता येईल, असे असेही आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.