“उजनी’ वेगाने भरले…

जिल्ह्यांतील धरणांतून मोठा विसर्ग आल्याने ऑगस्ट महिन्यांत पाणीपातळी ओलांडली

बिजवडी- उजनी धरण गेल्या चार ते पाच वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरत आहे. 2010 ते 2014 पर्यंतच्या कालावधीत धरणांतील पाण्याची पातळी कमी अधिक होती. त्यानंतरच्या कालावधीत सोलापुरातून पाण्याची मागणी अधिक वाढू लागल्याने धरण डिसेंबर-जानेवारी महिन्यांतच आटू लागले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पुणे जिल्ह्यांतील धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने धरण ऑगस्ट महिन्यांतच पूर्ण भरत आहे.

उजनी धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी असताना केवळ जिल्ह्यातील विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने धरण ऑगस्टमध्ये पूर्ण भरत आहे. रविवारीही (दि.18) भीमेत 11 हजार 600 क्‍युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. पुणे धरण क्षेत्रांत अद्यापही पावसाची भुरभुर कायम असल्याने धरणांत येणारा पाण्याचा प्रवाह कायम आहे. यामुळेच दौंड येथून 12 हजार 351 तर बंडगार्डनहून 9 हजार 760 क्‍युसेकचा विसर्ग उजनीत आला. आज, धरणातील पाणी पातळी 497.280 मीटरतर 122.66 टीएमसी पाणीसाठा असल्याने 2900 क्‍युसेकने भीमेत पाणी सोडण्यात आले आहे.

उजनीधरण जानेवारी महिन्यांतच आटल्याने इंदापूर, बारामती तालुक्‍यातील जनतेसह सोलापुरकरांच्या तोंडचे पाणी पळाले होते, त्यातच सोलापुरात पावसाने पाठ फिरवल्याने पाणी योजनांचे तलावही कोरडे पडले होते. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती तसेच उद्योगांकरीताच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता.

या सर्व पार्श्‍वभुमीवर सोलापुरला रेल्वेतून पाणी पुरविण्याचाही विचार शासकीय पातळीवर सुरू झाला होता. मात्र, जुन महिन्यांत (दि.7) पाऊस पडला तर पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे जुलै महिन्यापर्यंत पहिल्या आठवड्यात भरत आली होती. तर, ऑगस्ट महिन्यांत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने धरणांतून उजनीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑगस्टमध्ये धरण क्षेत्रांत मुसळधार पावसामुळे धरणं “ओव्हर फ्लो’ झाली होती. पुणे जिल्ह्याच्या नीरा, भीमेकाठी तर पुरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे उजनी धरणांत येणारा विसर्गही वाढल्याने धरण अवघ्या 15 दिवसांत पूर्ण भरले.

सध्या, धरणांत —- पाणीसाठा आहे. पावसाचे प्रमाण आता कमी झाल्याने उजनीतील विसर्गही बंद झाला आहे तसेच उजनीतूनही भीमेत होणारा विसर्ग कमी करण्यात आला असून दारे बंदचे नियोजन विशेष बैठक घेवून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

  • उजनीत या धरणांतून येणारा विसर्ग –
    विर्सग सुरू असलेली धरणे. पानशेत : 1954 क्‍युसेक, खडकवासला: 3424, मुळशी: 5000, कळमोडी: 129, चासकमान: 1110, आंध्रा: 980, गुंजवणी: 300, भाटघर : 810, नीरा देवघर : 2458, वीर: 14161, डिंभे: 1920, चिल्हेवाडी: 848, घोड : 1160, बंडगार्डन: 11061, दौंड : 9175, वीरधरण: 4887 यामध्ये काही धरणांतून विसर्गाचे प्रमाण पावसाच्या प्रमाणानुसार कमी अधीक करण्यात येत आहे.
  • उजनी धरणात येणाऱ्या विसर्गानुसार भीमेत पाणी सोडण्यात येत आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर असून पीण्याकरीता, शेती तसेच उद्योग याबाबतही विचार प्रासकीय पातळीवर केला जात आहे.
    – धीरज साळे, अधिक्षक अभियंता, जलसंपदा विभाग
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×