उदयनराजे भेटणार पंतप्रधानांना

महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेसाठी नाशिकला रवाना

सातारा – दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी खासदार उदयनराजे भोसले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यावेळी राहिलेली भेट आता नाशिकमध्ये होणार आहे. महाजनादेश यात्रेची सांगता सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या, दि.19 रोजी नाशिक येथे होणार आहे. या सभेत उदयनराजे हे मोदींची भेट घेणार असल्याचे समजते. त्यासाठी उदयनराजे नाशिकला रवाना झाले आहेत.

खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नढ्ढा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी उपस्थित होते. मात्र, उदयनराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मिळाली नव्हती. ही भेट आता नाशिकमध्ये होणार आहे. नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत नाशिकच्या तपोवन मैदानात महाजनादेश यात्रेची सांगता सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता कधीही लागू शकते. संभाव्य आचारसंहिता आणि यात्रेच्या सांगतेमुळे महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहे.

पाच वर्षापूर्वी रायगड येथे पंतप्रधानांची भेट घेण्याची संधी उदयनराजेंनी गमावली होती. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी रायगडावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर वीस मिनिटे नतमस्तक होऊन आत्मचिंतन केले होते. त्या भेटीकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील बदललेले राजकीय वारे, राष्ट्रवादीत होणारी घुसमट याला कंटाळून उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान मोदी व उदयनराजे हे महाजनादेश यात्रेच्या सांगता सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत. कोण मोदी? आम्हाला साताऱ्यातील पेढेवाले मोदी ठाऊक आहेत, हे उदयनराजेंचे वक्‍तव्य गाजले होते. आता भाजपमधील प्रवेशानंतर उदयनराजेंची मोदींशी होणारी पहिली भेट चर्चेचा विषय ठरणार, हे नक्‍की.

Leave A Reply

Your email address will not be published.