U19 WorldCup 2024 (Nepal vs Afghanistan) : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या ICC अंडर-19 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या गट-डी सामन्यात शुक्रवारी नेपाळ अंडर-19 संघाने अफगाणिस्तान अंडर-19 संघाचा 1 गडी राखून पराभव करून स्पर्धेत मोठा उलटफेर केला आहे. यासह, नेपाळचा अंडर-19 संघ प्रथमच आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या सुपर 6 फेरीसाठी पात्र ठरला आहे. पूर्व लंडनच्या बफेलो पार्क मैदानावर हा ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर नेपाळच्या अंडर-19 संघाचा जल्लोषही पाहण्यासारखा होता.
अफगाणिस्तानचा 1 गडी राखून केला पराभव….
आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2024 स्पर्धेतील गट-ड सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि नेपाळ संघाकडे गोलंदाजी सोपवली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय अफगाणिस्तानसाठी अत्यंत चुकीचा ठरला आणि संपूर्ण संघ 40.1 षटकात अवघ्या 145 धावांत सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून अल्लाह गझनफरने सर्वाधिक 37 धावा केल्या. नेपाळकडून वेगवान गोलंदाज आकाश चंदने 5 बळी घेतले. दिपेश कंडेलने 2 बळी घेतले. याशिवाय तिलक भंडारी, सुभाष भंडारी आणि गुलशन झा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
A stunning one-wicket win over Afghanistan gives the Rhinos a spot in the Super Six stage of the #U19WorldCup 😯#AFGvNEP pic.twitter.com/S7yvUGdXmi
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 26, 2024
रोमाचंक सामन्यात नेपाळ विजयी…
146 धावांचा पाठलाग करताना नेपाळ संघाने 44.4 षटकात 9 गडी गमावून 149 धावा केल्या आणि सामना जिंकला. नेपाळकडून फलंदाजी करताना देव खनालने सर्वाधिक 58 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फरिदून दाऊदझाईने सर्वाधिक 3 बळी घेतले. खलील अहमद आणि नसीर खान यांनी 2-2 बळी घेतले. याशिवाय अल्लाह गझनफरला 1 यश मिळाले. विशेष म्हणजे अफगाणिस्तान संघ या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला होता, तर नेपाळ संघाने पात्रता फेरीतून या स्पर्धेत प्रवेश केला होता. अशाप्रकारे नेपाळ संघाने कमी धावसंख्येच्या रोमाचंक सामन्यात उलटफेर करताना विजयाची नोंद करून अफगाणिस्तान संघाला घायाळ केले.
नेपाळने केला मोठा उलटफेर…
दरम्यान, ICC अंडर-19 विश्वचषक 2024 स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांना 4-4 गटांमध्ये विभागण्यात आले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि नेपाळ यांना 19 वर्षांखालील विश्वचषक 2024 स्पर्धेच्या ड गटात ठेवण्यात आले आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या संघांनी गट-ड मध्ये 2-2 सामने जिंकून 4-4 गुणांसह सुपर 6 फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. तर, नेपाळने ‘ड’ गटातील अफगाणिस्तानविरुद्ध केवळ एक सामना जिंकून 2 गुणांसह सुपर 6 फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे अंडर-19 विश्वचषक 2024 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाला निराशेचा सामना करावा लागला आहे.