कराड – चचेगाव (ता. कराड) येथे दोन युवकांचा पाठलाग करीत त्यांना कोयता व तलवारीचा धाक दाखवला. तसेच त्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवार दि. 12 मार्च रोजी घडलेल्या या घटनेबाबत शुक्रवारी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. त्यानुसार 16 जणांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक वगरे, रोहन वगरे, विकास घारे, ओमकार वगरे, कुमार वगरे, महेश माने, शिवाजी माने, आबा घारे (सर्व रा. घारेवाडी ता. कराड) यांच्यासह अनोळखी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत श्रीधर राजेंद्र घारे (रा. घारेवाडी) या युवकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घारेवाडी येथील श्रीधर घारे याच्या कुटुंबीयांचा जमिनीच्या कारणावरून अशोक वगरे याच्याशी वाद झाला होता. या वादावादीमध्ये श्रीधरची आई जखमी झाली. तिच्यावर कराडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.
12 मार्च रोजी जखमी आईला पाहण्यासाठी श्रीधर घारे व त्याचा भाऊ रितेश घारे हे दोघे दुचाकीवरून घारेवाडीहून कराडला येत होते. ते दोघे चचेगावच्या हद्दीत आले असताना एक जीप व दुचाकीवरून त्यांच्या दुचाकीच्या काही जण आडवे आले. त्यांच्या हातात लाकडी दांडके, कोयता आणि तलवार होती. ते मारहाण करण्याच्या उद्देशाने आल्याचे निदर्शनास आल्यानंतर श्रीधर व त्याचा भाऊ रितेश दोघेही दुचाकी त्याच ठिकाणी सोडून नजीकच्या ऊसाच्या शेतात पळाले. त्यावेळी संशयितांनीही त्यांच्या गाड्या तेथेच सोडून दोघांचा पाठलाग केला.
श्रीधर व रितेश ऊसातून पळून जाऊन एका ओढ्याच्या कडेला गेले. त्यावेळी संशयितांनी तीनवेळा पिस्तुलातून गोळीबार केला. गोळीबाराच्या प्रकारानंतर घाबरलेल्या श्रीधर व रितेश यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. गावातील एका घरात त्यांनी आसरा घेतला. संबंधित कुटुंबीयांनी त्या दोघांना धीर देत आपल्या घरात लपवून ठेवले. काही वेळाने त्यांचा पाठलाग करणारे संशयित तेथून निघून गेले. श्रीधर घारे याने शुक्रवारी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कराड ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.