जगभरातील मृतांची संख्या 90 हजारांजवळ
पॅरिस : अमेरिकेत करोनाचा कहर चालूच आहे. त्या देशात सलग दोन करोनाने जवळपास 2 हजार बळी घेतले. दरम्यान, त्या विषाणूमुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 90 हजारांच्या घरात पोहचली आहे.
जगभरात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या 15 लाखांवर पोहचली आहे. अमेरिकेत सर्वांधिक 4 लाखांहून अधिक बाधित आहेत. त्या देशातील मृतांचा आकडा 15 हजारांजवळ जाऊन पोहचला आहे. जगातील सर्वांधिक मृतांची नोंद इटलीत झाली आहे. त्या देशात करोनाने आतापर्यंत 17 हजारांहून अधिक बळी घेतले आहेत. त्यामध्ये 100 डॉक्टरांचाही समावेश आहे. इटलीपाठोपाठ स्पेनमध्ये 15 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. मृतांच्या संख्येत फ्रान्सने 10 हजारांचा तर ब्रिटनने 7 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. इराणमध्ये करोना संसर्गामुळे 4 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत.
करोनाबाधित आणि जीवितहानीचा विचार करता युरोपला सर्वांधिक तडाखा बसला आहे. त्या खंडात करोनाची बाधा झालेल्यांची संख्या जगभरातील बाधितांच्या निम्मे आहे. त्याशिवाय, एकट्या युरोप खंडात 62 हजारांहून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. जगातील तब्बल 209 देश आणि प्रदेशांत करोनाचा फैलाव झाला आहे. करोना संकटावर मात करण्याचे मोठेच आव्हान संपूर्ण जगापुढे उभे राहिले आहे. त्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.