कोलंबो : – श्रीलंकेत येत्या 30 ऑगस्टपासून आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदाची स्पर्धा एकदिवसीय सामन्यांच्या रचनेनुसार खेळवली जाणार आहे. मात्र, आता या स्पर्धेवर पुन्हा एकदा करोनाचे सावट निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह ठरल्यामुळे पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे.
श्रीलंकेचे दोन खेळाडू हे कोविड-19 पॉझिटिव्ह झाले असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंका संघातील अविष्का फर्नांडो आणि विकेटकिपर कुसल परेरा यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीलंका हा या स्पर्धेचा गतविजेता संघ आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी श्रीलंकेने संभाव्य संघ जाहीर केला असून त्यात कुसल परेराने पुनरागमन केले आहे. मात्र, आता त्याची सातत्याने चाचणी केली जाणार असून त्यानंतरच तो या स्पर्धेत खेळेल का ते स्पष्ट होणार आहे.
या स्पर्धेत श्रीलंका संघ गट क्रमांक 2 मध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध खेळणार आहे. यंदाची स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तान हे दोन देश मिळून आयोजित करणार आहेत.
यापूर्वी ही स्पर्धा टी-20 प्रकारात खेळवली जात होती. मात्र, यंदा भारतात येत्या 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने आशिया स्पर्धाही एकदिवसीय रचनेत होणार आहे. त्यामुळे सर्व संघांना सराव मिळणार आहे.
श्रीलंकेने आशिया करंडक सहा वेळा जिंकला आहे. त्यांनी पहिल्यांदा 1986 साली विजेतेपद मिळवले होते. त्यावेळी स्पर्धेचे यजमानही श्रीलंकाच होती. 1986 साली श्रीलंका ही स्पर्धा आयोजित करणारा पहिलाच देश ठरला होता.