मुंबई – मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना दोन धावपटूंचा मृत्यू झाला तर २२ धावपटूंना त्रास जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. सुव्रदीप बॅनर्जी (४०) आणि राजेंद्र बोरा (७४) अशी मृत्यू झालेल्या धावपटूंची नावे आहेत. धावत असताना अचानक ते कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.
मुंबई मॅरेथॉनच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले कोलकाताचे सुव्रदीप बॅनर्जी हे धावत असताना हाजी अली जंक्शनजवळ कोसळले. पोलिसांनी त्यांना तातडीने नायर रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तसेच नरिमन पॉईंट परिसरामध्ये राजेंद्र बोरा हे कोसळलेल्या अवस्थेत आढळले.
त्यांच्यावर मुंबई मॅरेथॉनचे वैद्यकीय सहभागी असलेल्या एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटच्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांनी उपचाराला कोणताही प्रतिसाद दिला नाही व त्यांचाही मृत्यू झाला.