एलसीबी व लोणीकंद डी.बी. पथकाची संयुक्तिक कारवाई
वाघोली- पुणे-नगर महामार्गावर लोणीकंद माथ्याजवळ पादचाऱ्यास मारहाण करून त्याच्याकडील 12 हजार रुपये रोख रक्कम, मोबाइल चोरून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एलसीबी व लोणीकंद पोलिसांच्या डी.बी.पथकाने अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तुषार रखमाजी पवार (रा. पिंपळनेर ता. पारनेर), राजू विजय तुपे (रा.आवटेवाडी ता. श्रीगोंदा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र समोर शुक्रवारी (दि.7) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंकज कुमार प्रजापती पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी प्रजापती यांना मारहाण करून त्यांच्याकडील 12 हजार रुपये रोख व दोन मोबाइल चोरून नेले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबी व लोणीकं द पोलिसांचे डी.बी.पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथून तुषार पवार व श्रीगोंदा येथून राजू तुपे यास अटक केली.
दोघांसोबत असणारा तिसरा साथीदार फरार आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तुषार पवार वर श्रीगोंदा, रांजणगाव पोलीस ठाण्यात चोरीचे व आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, दत्तात्रेय गिरमकर, दयानंद लीमन, सचिन गायकवाड, ज्ञानेश्वर क्षीरसागर, जनार्दन शेळके, एम.आय.मोमीन, राजापुरे, लोणीकंद डी. बी. पथकाचे बाळासाहेब सकाटे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, श्रीमंत होनमाने, सूरज वळेकर यांच्या पथकाने केली.