पिंपरी, (प्रतिनिधी) – अफूच्या बोंडाचा चुरा आणि अफीम विक्री प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे केली.
पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी मंगळवारी (दि. २३) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बलजिंदरसिंग जागरसिंग सोही (वय 59, रा. प्राधिकरण निगडी), नसीब रुपचंद मिस्त्री (वय 40, रा. खराळवाडी, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 हजार 390 रुपये किमतीचा 826 ग्रॅम अफूच्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), 53 हजार 600 रुपये किमतीचा 134 ग्रॅम अफीम असा एकूण 65 हजार 990 रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केले.