कराड (प्रतिनिधी) – येथील कृष्णा हॉस्पिटलच्या करोना कक्षात उपचार घेत असलेल्या बाबरमाची आणि चरेगाव येथील दोन्ही करोनाग्रस्त रुग्णांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते करोनामुक्त झाले. त्यांना सोमवारी टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, एस. ए. माशाळकर यांच्यासह डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. नागपूर रिटर्न असलेल्या बाबरमाची येथील 32 वर्षीय युवकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तो दि. 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.
तर कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दि. 17 एप्रिल रोजी चरेगाव येथील पुण्याहून आलेल्या एका 30 वर्षीय युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याला पुढील उपचारासाठी दि. 25 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांवर शासनाच्या निकषानुसार उपचार करण्यात आले. दोन्ही रुग्ण आज करोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.