भुज : गुजरात आणि पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. दोन्ही राज्यांतील त्या महत्वपूर्ण घडामोडींमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) योगदान दिले.
भारतात अवैध शिरकाव केल्यावरून शोएब अहमद (वय 38) याला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सोमवारी रात्री पकडण्यात आले. सीमा ओलांडून त्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्याच्याकडे काही पाकिस्तानी चलन आणि हुंगण्याची पावडर सापडली. त्यावरून त्याला अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन असल्याचा अंदाज बांधण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर बीएसएफच्या पथकाने त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात सोपवले.
दरम्यान, पंजाबच्या फिरोजपूर क्षेत्रात मंगळवारी बीएसएफच्या पथकाने एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली. सादिक (वय 50) असे त्याचे नाव असल्याचे समजते. सीमेलगत भारतीय हद्दीत संशयास्पदरित्या फिरत असताना त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडेही पाकिस्तानी चलन आढळले. त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. कुठल्या हेतूंनी त्यांनी भारतीय हद्दीत शिरकाव केला याचा शोध भारतीय यंत्रणा घेत आहेत.