सोलापूर : सोलापुर – तुळजापूर महामार्गावर तामलवाडी गावजवळच्या पुलावर एका गॅस सिलेंडर मालवाहू ट्रकला भीषण आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडरच्या स्फोटानंतर ट्रकने पेट घेतला आणि ट्रक जळून खाक झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचण्याआधी ट्रक जळून खाक झाला. सोलापूर आणि उस्मानाबाद तसेच तुळजापूर येथून आलेल्या गाड्यानी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. ट्रक आणि सिलेंडर बाजूला काढण्याचे काम सुरू होते.
300 सिलेंडर क्षमतेचा ट्रक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घटनास्थळापासून जवळ असलेल्या घरांना हादरे बसले. स्फोटाच्या आवाजाने गावकरी घटनास्थळी जमा झाले असता ट्रकला आग लागली असल्याची निदर्शनास आले.
गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना आणि अग्निशमन दलाला माहिती कळविली.पोलिसांनी दोन्ही बाजूनी वाहतूक थांबविली तर स्पीकरच्या माध्यमातून गावकऱ्यांना आवाहन करत घर मोकळे करण्याच्या सूचना दिल्याने मोठा अनर्थ टळला. एकापाठोपाठ गॅस सिलेंडरचे स्फोट होत होते. आजूबाजूला त्याची दाहकता जाणवत होती. या अपघातामुळे वाहतूक थांबविल्याने महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.