पिंपरी – ज्यांचे दोन मंत्री जेलमध्ये आहे त्यांनी आमच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करू नयेत, असा पलटवार भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीवर केला. दै. प्रभातच्या कार्यालयातील गणरायाचे दर्शन आ. लांडगे यांनी घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या आरोपांबाबत विचारले असता आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर पलटवार केला. राष्ट्रवादीला भष्ट्राचाराचे आरोप करू द्या, आम्ही विकास करीत राहू. राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सत्ता होती. त्यांचे दोन मंत्री सध्या जेलमध्ये आहे. त्यामुळे आमच्यावर भष्ट्राचाराचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीला नाही आणि असल्या आरोपांकडे आम्ही लक्षही देत नाही.
विकासकामांच्या बाबतीत आमचा हेतू प्रामाणिक आहे. मागच्या अडीच वर्षात आम्हाला विकासकामे करताना खूप त्रास सहन करावा लागला. आमचे सरकार असताना आम्ही काम करताना कधीही भेदभाव केला नाही. शहरासाठी मागच्या पाच वर्षात ज्या योजना आणल्या, जी विकासकामे केली ती 20 वर्षांपूर्वी होणे आवश्यक होते. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घ्याव की लोक आरोपाला नाही तर विकासाला मतदान करतात.
आ. लांडगे म्हणाले, मी भाजपचा अध्यक्ष असलो तरी माझ्यासोबत भाजपमधील कार्यकर्ता असल्याने आम्ही 100पेक्षा अधिक जागा जिंकू. लोकहिताचे युतीचे सरकार आल्याने विकासाला चालना मिळणार आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने विकासकामात अडचण येणार नाही.
आमदार लांडगे म्हणाले की, कोविडचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागला आहे. कोविडच्या संकटातून आपण बाहेर पडलो आहोत. हे संकट पुन्हा कोणाच्याच नागरिकांच्या आयुष्यात येऊ नये, हीच प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे.
मंत्रीपदाचा मान जगतापांना मिळावा
पुणे जिल्ह्यातून अनेक मंत्री झाले आहेत. मात्र पिंपरी चिंचवडला अद्याप संधी मिळालेली नाही. तसेच सध्या लांडगे यांना राज्य मंत्री पद मिळण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्येष्ठत्वाच्या नात्याने चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मंत्री होण्याची मोठी संधी आहे. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील तो मान्य राहील. मंत्रीपद मिळो अथवा ना मिळो. त्याचा शहराच्या विकासावर काहीही परिणाम होणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून आम्ही विकासकामे करीत आहोत.