वीस लाख डॉलर्स नोटा वापरून केलं पबचं इंटेरियर

मियामी – अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये तेथील पबमध्ये मिळणाऱ्या दारुसाठी असे पब प्रसिद्ध असले तरी असा एक पब आहे तो तिथे मिळणाऱ्या दारूपेक्षा ही तेथील इंटेरियरसाठी प्रसिद्ध आहे. या पबमध्ये अंतर्गत सजावटीसाठी चक्क वीस लाख डॉलर्स मूल्याच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या फ्लोरिडा या राज्यांमध्ये पेसाकोला शहरांमध्ये मॅकग्वियर नावाचा हा पब असून तेथे ही अनोखी सजावट करण्यात आली आहे. या पबच्या सिलिंगवर वीस लाख डॉलरच्या नोटा चिकटवण्यात आल्या आहेत.

हा पब 1977 मध्ये मार्टिन मॅकग्वियर आणि त्याची पत्नी मॉली यांनी सुरू केला होता. मार्टिन बार सांभाळत होता आणि मॉली टेबलवर सर्व्हिस देत होती. पब सुरू झाल्यानंतर पहिल्या ग्राहकाकडून मॉलीला जेव्हा एक टीप मिळाली तेव्हा त्या एक डॉलरच्या नोटेवर मॉलीने तारीख लिहून त्या ग्राहकाची सही घेऊन गुडलक म्हणून ती नोट चिकटवून ठेवली.

त्यानंतर या पबमध्ये ही प्रथा सुरु झाली जे ग्राहक त्या ठिकाणी येत असते ते आपली सही टीपच्या नोटेवर करून ती नोट चिकटवून ठेवून जाऊ लागले. अशा प्रकारच्या नोटांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तेव्हा या दाम्पत्याने त्याचा वापर इंटरियर डिझाईन साठी करण्याचा निर्णय घेतला.

पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रात असलेल्या या पबच्या प्रत्येक खोलीतील सिलिंगवर आता या नोटा चिकटवण्यात आल्या आहेत. वीस लाख डॉलरपेक्षा जास्त मूल्याच्या नोटा या पबमध्ये अशाप्रकारे चिकटवण्यात आले असल्याने अनेक चोरांची नजर त्यावर पडली आहे आणि अनेक वेळा हे पैसे चोरण्याचा प्रयत्नही झाला आहे.

नुकतेच एका चोराने या नोटा पैकी पाच हजार डॉलरच्या नोटा चोरल्या पण त्या नोटा तो बाजारात खपवू शकला नाही कारण त्या प्रत्येक नोटावर ग्राहकाची सही होती. आणि अशा प्रकारच्या नोटा चलनात आणता येत नाहीत. या अनोख्या इंटरियर डिझाईनसाठी हा पब प्रसिद्धीस आला असून दिवसेंदिवस या पबमधील गर्दी आणि नोटांची संख्या वाढतच चालली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.