- 150 अधिकारी -कर्मचारी
- 10 हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासणार
पिंपरी – करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सिरो सर्व्हे करण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील सुमारे 10 हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासण्यात येणार आहेत. महापालिकेच्या 8 रुग्णालयांमधून प्रत्येकी 3 टीम तयार करण्यात येणार असून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असे 150 जणांची याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या टीमद्वारे पुढील दहा दिवस शहरातील 200 भागांमध्ये अँटीबॉडी तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये झालेला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील दहा हजार नागरिकांची अँटीबॉडी तपासणी करण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग शहरातील किती नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. याचा अंदाज घेण्यासाठी होईल. जेणेकरून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील उपचार करणे शक्य होईल.
शहरातील करोनाबाधितांची संख्या कमी झाली असून ही समाधानकारक बाब असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य आणि प्रशासन विभागास त्याअनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. सिरो सर्व्हेसाठी घरी येणाऱ्या महापालिकेच्या वैद्यकीय पथकास रक्त नमुने घेण्यास शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर माई ढोरे यांनी केले आहे.