मोरगिरी : पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील गुरेघर परिसरात रविवारी रात्री ९ च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील माजी नगरसेवक मदन कदम (मल्हारपेठ) याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. यामुळे पाटण तालुक्यात मोरणा गुरेघर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान मदन कदम याला पाटण पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, पाटण तालुक्यातील गुरेघर धरण परिसरात रविवारी रात्री नऊच्या सुमारास पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मदन कदम याने गोळीबार केला. यामध्ये श्रीरंग जाधव (वय ४५), सतीश सावंत (वय ३०) हे दोघे जागीच ठार झाले.
तर प्रकाश जाधव (४२) जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी कराडला हलवण्यात आले आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बांगर, उपअधीक्षक विवेक लावंड, पोलिस निरीक्षक विकास पाडले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान दोन्ही मृतदेह ऑन कॅमेरा शवविच्छेदनासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाइकांची पाटण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.