चिंबळी – चाकण-तळेगाव रस्त्यावर दुचाकी आणि पीएमपीएमएलच्या अपघातात दुचाकीस्वार आणि आणखी एक तरुण अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. खालुंब्रे ( ता. खेड) गावच्या हद्दीत रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यवान कुंडलिक बेंद्रे (वय 30, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव आहे. शिवजीत अजयकुमार मंडल (वय 21, रा. वडगाव मावळ) आणि एक सुमारे 25 वर्षीय अनोळखी तरुण यांचा मृत्यू झाला. पीएमपीएमएल बस क्रमांक (एमएच 14 एचक्यू 5983) घेऊन बसचालक बेंद्रे तळेगाव दाभाडे ते चाकण रस्त्यावर भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी समोरून शिवजीत आपली दुचाकी (एमएच 04 ईजी 8621) घेऊन जात असताना दुचाकीला आणि आणखी एका अनोळखी तरूणाला बसने जोरदार ठोकर दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला असल्याचे महाळुंगे पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.