महामार्गावर पेठ-माळेगाव हद्दीतील घटना : कारचालकावर गुन्हा
मंचर -पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ-माळेगाव येथे येणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 29) रात्री घडला. याप्रकरणी कारचालकावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाकल केला आहे. हे दोघेही लाडगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील असून चाकण येथे शेतीकामाच्या शोधात जात असताना ही दुर्घटना घडली.
गणेश वाळू धोंगडे (वय 27), सोमनाथ धोंडू धोंगडे (वय 32, दोघे रा. लाडगाव ता. अकोले, जि. नगर) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. अक्षय गोपाळ निंबाळकर (वय 24, रा. भोसरी-पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार चालकाचे नाव आहे. तर रुग्णवाहिका चालक नवनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, गणेश धोंगडे व सोमनाथ धोंगडे हे शेतीकामाच्या शोधात पुणे-नाशिक महामार्गाने चाकणकडे दुचाकी (एमएच 03 यू 6462) ने निघाले होते.
पेठ-माळेगाव येथे पाठीमागून (एमएच 14 एचके 5817) आलेल्या सॅन्ट्रोकारने त्यांना जोरदार धडक दिली. यात हे दोघे महामार्गावर पडले. तेथील भैरवनाथ प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेचे चालक नवनाथ पवार आणि आदित्य पवार यांनी तातडीने वैद्यकीय उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताचा पंचनामा पोलीस कर्मचारी व्ही. एस. साबळे यांनी केला.
तर अक्षय निबाळकरने भरधाव वेगात निष्काळजीपणाने वाहन चालवून रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे. तर हा अपघात हा खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा खेड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल लाड यांनी सांगितले. मृत गणेश धोगडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. तर मृत सोमनाथ धोंगडे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे.