कोलवडी-मांजरीत दुसऱ्या बिबट्या रेस्क्यू टीम दाखल
वाघोली – शेतात काम करीत असताना दिवसा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे बिबट्या रेस्क्यू टीम आठवड्यात दुसऱ्यांदा कोलवडी-मांजरी खुर्दमध्ये दाखल झाली होती. कोलवडी येथील शितोळे वस्ती परिसरात पाच दिवसांपूर्वी, तर मांजरी खुर्द येथील सावकार वस्ती येथे बुधवारी (दि. 25) सकाळी व दुपारी दोनवेळा बिबट्याचे दर्शन झाले. रेस्क्यू टीम दाखल झाल्यानंतर त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांना बचावासाठीची माहिती देऊन रिकाम्या हाती त्यांना परतावे लागले. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा लावला, मात्र बिबट्या गुंगारा देत आहे.
एक मादी बिबट्या व बछडा असल्याचे पावलांच्या ठशांवरून दिसत आहे. मादी व बछडा असल्याने पिंजरा लावणे कायदेशीर दृष्टीने तांत्रिक अडचण असल्याने परिसरात पिंजरा सध्या तरी लावता येणार नसल्याचे वनविभागाने सांगितले. परिसरात शेतकऱ्यांनी फटाके वाजवावे, शक्यतो सायंकाळी सातनंतर मुलांना घराबाहेर पाठवू नये.
रात्री एकट्याने शेतात जाणे टाळावे, घराभोवती पुरेसा उजेड असावा, पाळीव जनावरे गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावी, अशी खबरदारी बाळगण्याचे आवाहन रेस्क्यू टीमने केले आहे. या परिसरात महिनाभरापासून ऊसतोड सुरू असल्याने मांजरी खुर्द, कोलवडी परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे, त्यामुळे नागरिक, शेतकरी भयभीत आहेत. कोलवडी शितोळे वस्ती परीसरात पिंजरा लावूनही पाच दिवस झाले बिबट्या वनविभागाला गुंगारा देत आहे.