राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलावर अपघातात मसूरचे दोन जण ठार

प्रशासन आता तरी जागे होेईल का?

सातारा – पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री सुरुर उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणार्‍या चारचाकीने धडक दिल्याने चारचाकीतील दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल केले. परंतु ते मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री सुरुर उड्डाण पुलावर ट्रकचा टायर फुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून येणार्‍या चारचाकीने क्र. (एम.एच. 04 जी.डी. 1205) धडक दिल्याने गाडीतील दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल केले, परंतु ते मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दोन्ही वाहने सातार्‍याच्या दिशेने येत होती. मयत झालेले मसूर, ता. कराड येथील युवक केदार दत्तात्रय वेल्हाळ (वय 25) व अजय रवींद्र सुतार (वय 27) आहेत. मध्यरात्रीच्या अंधारात सुरुर ग्रामस्थांनी येथील भुईंज पोलिसांना घटनास्थळी बोलवले. भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पी. एस. आय. रत्नदीप भंडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे व चालक वाघ हे घटनास्थळी हजर झाले.

केदार व अजय हे जिवलग मित्र होते. केदारचे शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरीच्या शोधात होता. त्याला रिमिक्स गाण्याचा छंद होता. त्याने गायलेली काही गाणी दुबई रेडिओवरून प्रसारित झाली आहेत. तो अविवाहित होता तर अजयला फोटोग्राफीचा छंद होता. काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. मार्चमध्ये अजयचा विवाह होणार होता. काल रात्री केदार मुंबईहून पुण्याला अजयकडे आला व तेथून ते मसूर गावी येत असताना वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दोघांच्याही मृत्यूची बातमी समजताच मसूरवर अक्षरश: शोककळा पसरली. दुपारी दोघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेळे ते आनेवाडी टोल नाका हा रस्ताच अपघाताला निमंत्रण देणारा आहे. चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे काम व बंद अवस्थेत असलेली महामार्गावरील लाईट व्यवस्था हीच अपघातांची नेहमीचीच कारणं आहेत. महामार्गावर होणार्‍या अपघातात रिलायन्स कंपनीवर प्रशासन गुन्हा दाखल करणार का हाच प्रश्‍न जनसामान्यांनमधून विचारला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.