अभियांत्रिकी अभ्यासक्रमही आता मराठीत; उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची घोषणा

पुणे – पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत तंत्रशिक्षण घेण्यास तसेच त्या विषयाची समज अधिक स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात त्यांनी अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचाराचे कार्य केवळ मराठी भाषा गौरव दिनापुरते मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.

सामंत म्हणाले, “मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा असून आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा दिन देशभरासह जगभरात साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर होणे आवश्‍यक असून यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

दिल्लीत मराठी विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या नूतन विद्यालयाच्या विकास आणि नूतनीकरणाच्या कामासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी दिल्लीत राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.