डेहराडून – उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत कोटद्वार आणि हरिद्वार ग्रामीण मतदारसंघांमधील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्या मतदारसंघांमधून दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या निवडणूक लढवत आहेत. वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याचे मिशन त्यांनी हाती घेतले आहे.
सत्तारूढ भाजपने कोटद्वारमधून रितू खंडुरी यांनी उमेदवारी दिली आहे. त्या माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी यांच्या कन्या आहेत. मुख्यमंत्रिपदावर असताना खंडुरी यांना त्या मतदारसंघात 2012 मधील निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. त्यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्रसिंह नेगी यांनी विजय मिळवला. आता ते पुन्हा कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.
उत्तराखंडमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने हरिद्वार ग्रामीणमधून अनुपमा रावत यांना उमेदवारी दिली आहे. त्या माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांच्या कन्या आहेत. त्या मतदारसंघात रावत हे मुख्यमंत्री असतानाच 2017 मधील निवडणुकीत पराभूत झाले.
त्या मतदारसंघातून भाजपच्या स्वामी यतिश्वरानंद यांनी विजय मिळवला. आता ते पुन्हा भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळे दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या वडिलांना पराभूत करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांविरोधातच निवडणूक लढवण्यास सज्ज झाल्या आहेत.