बारामती (पुणे) – बारामती तालुक्यातील एका गावातील महिलेने कौटुंबिक वाद झाल्यानंतर विष प्राशन केले होते. या घटनेचा तक्रारीचा तपास एका पोलीस उपनिरीक्षकाकडे सोपविण्यात आला होता; मात्र संबंधित उपनिरीक्षकाने तक्रारदार महिलेला आपल्या ‘प्रेम’ जाळ्यात ओढल्याने संबंधित महिलेच्या पतीने या उपनिरीक्षकाविरोधात तक्रार केल्याने तो आता चौकशीच्या फेर्यात अडकला आहे. त्यामुळे विवाहितेला मोहित करण्यासाठी खाकीची जाबाबदारी विसरल्याची चर्चा सध्या बारामतीत रंगली आहे.
संबंधित महिला ही एम. पी. एस.सी.चा अभ्यास करत असल्याची माहिती संबंधित उपनिरीक्षकाला मिळाली होती. त्यामुळे या विवाहितेला एम. पी. एस. सीच्या अभ्यासक्रमासाठी पुण्यात ठेवतो. तेथे लागेल ती मदत करतो अशी भुरळ पतीला घातली. आपली पत्नी शिकून एखादी अधिकारी होईल या आशेवर पतीने दोन मुली असताना सुद्धा तिला अभ्यासाठी परवानगी दिली. काही दिवसानंतर संबंधित महिलेने कुटुंबाशी संपर्क तोडायला सुरवात केली. नंतर दि. 16 जानेवारी रोजी महिलेच्या हातावर पोलिस उपनिरीक्षकाच्या नावाचा टॅटू पतीला दिसून आला. यावर पती-पत्नीचा वाद झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने फोनवरून तिच्या नवर्याला जाब विचारला तर तुझे हातपाय मोडीन अशी भाषा वापरली. या शिवाय दोन खासगी माणसे घरी पाठवून बंदुकीचा धाक दाखवून साहेबांच्या नादी लागू नको नायतर साहेब तुला संपवून टाकतील अशी धमकी दिली.
हे प्रकरण गंभीर होत चालल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तक्रारदाराने ही गोष्ट भावंडांना सांगितली. संबंधित कुटुंबाने लागलीच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी तातडीने अपर अधीक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याने संबंधित उपनिरीक्षकाचे धाबे दणाणले असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.
सेवेतूनच बडतर्फ करा…
या प्रकरणामुळे संबंधित महिलेच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना आता दोन लहान मुली आहेत. आता या मुलींना मी आई कोठून आणून देऊ. माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून माझे कुटुंब उद्ध्वस्त करणार्या पोलीस उपनिरीक्षकाची बदलीची जुजबी कारवाई न करता. सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी होत आहे.