वाघोली- केसनंद (ता. हवेली) रोडवरील शिल्पा प्रॉपर्टीजमध्ये इमारत बांधण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.1) घडली आहे. पोलिसांनी दुसऱ्यादिवशी आई- वडिलांचे जबाब घेतले. मात्र, त्यांच्या जबावाने पोलीस यंत्रणा चक्रावली आहे.
संदीप विशाल थापा (वय 9), मनीषा टेकेंद्र थापा (वय 6), असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. लिनिया सोसायटी लेबर कॅम्पलगत शिल्पा प्रॉपर्टीज यांच्या मालकीची मोकळी जागा आहे. जागेला पत्र्याचे शेड मारले असून एका ठिकाणी रस्ता ठेवला आहे. शेडबाहेर नेपाळ येथून आलेले कुटुंब राहते. तीन मुले खेळताना पत्र्याच्या शेडमधून पाण्याने भरलेल्या खड्डयाजवळ आले.
यावेळी मनीषा व संदीप ही दोन मुले पाण्यात पडल्याचे नवराज सुतार याने त्या मुलांच्या घरी सांगितले. ऑफिसबॉय धर्मेश थापा यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोघांना वाघोलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शिल्पा प्रॉपर्टीजच्या संबंधित मालकाशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.