Jalan News : जालनामधील अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज आणि दगडफेकीच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटले होते. अंतरवली सराटीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या राड्यानंतर दगडफेकीच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे, शनी सिरसट, कैलास सुरवसे यांना जालन्यातील अंबड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालीन कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी कायदा सुव्यस्था राखण्याच्या आणि उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असल्याच्या दृष्टीने, उपोषण मागं घेण्याची विनंती केली होती. यादरम्यान तीन वेळा पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. यानंतर सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास उपोषणाच्या व्यासपीठासमोर बसलेले आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आले.
यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचं सांगितलं. यानंतर संतप्त गावकरी आणि आंदोलकांनी दगडफेक सुरु केली. या घटनेत शेकडो आंदोलक आणि अनेक पोलीस जखमी झाले होते. याचे परिणाम संपुर्ण राज्यात उमटले होते. त्याच रात्री राज्यातील अनेक भागात जाळपोळ झाली होती. यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले होते.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. साताऱ्यातील कराडमध्ये अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी अंतरवाली सराटीत लाठीचार्ज आणि दगडफेकी प्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाणार अशी माहिती दिली.