पिंपरी – जम्बो कोविड सेंटर, बाणेर येथील मयताच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊ हजारांचा ऐवज हस्तगत केला.
अनिल तुकाराम संगमे (वय 35, रा. गंगानगर, रहाटणी) आणि त्यांची महिला साथीदार (वय 36, रा. गुरुदत्त कॉलनी, रहाटणी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी वंदू गिरे आणि राजेंद्र काळे यांना बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुणाल हॉटेल, काळेवाडी येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून नऊ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. हे दोन्ही आरोपी मिळून बाणेर येथील कोविड सेंटरमधील मयताच्या अंगावरील दागिने चोरत असे. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.