पिंपरी– बॅंकेच्या ऍप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचण येत असल्याने इंटरनेट वरून मिळवलेल्या हेल्पलाइनवर संपर्क केला असता अज्ञात व्यक्तीने ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर व्यक्तीच्या खात्यातून सव्वादोन लाख रुपये काढून फसवणूक केली. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी चिंचवडगाव येथे घडली.
रविराज सतीश कर्णे (वय 32, रा. चिंचवडगाव, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे एसबीआय बॅंकेचे योनो ऍप्लिकेशन चालत नव्हते. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन कस्टमर केअर नंबर शोधला. त्यांना 9339601192 हा क्रमांक मिळाला. त्यांनी त्यावर फोन केला असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना anydes app हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या बॅंकेतील बॅलन्स तपासला असता बॅंक खात्यात केवळ दहा रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. बॅंकेत चौकशी केली असता त्यांना समजले कि, त्यांच्या सेविंग अकाउंटवरील व फिक्स डिपॉझिट वरील लोन केलेले पैसे 31662960569 व 32962463275 या खात्यांवर ट्रान्स्फर झाले आहेत. तसेच एटीएम मधून देखील 20 हजार रुपये काढण्यात आले. एकूण दोन लाख 27 हजार 550 रुपये फिर्यादी यांच्या बॅंक खात्यातून काढून घेत अज्ञाताने फिर्यादी यांची फसवणूक केली आहे.