पिंपरी- नाल्यात उडी मारून एका मद्यपीने दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र अग्निशामक दलाच्या जवानाने त्याला सुखरूप बाहेर काढले. ही घटना भोसरी येथे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी घडली.
लालू महेंद्र शहा (वय 32) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी अग्नीशमन दलाच्या शेजारील नाल्यामध्ये एक व्यक्ती पडल्याची माहिती सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास दिली. भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी जाऊन नाल्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला लॅंडर व रोपच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढून भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र त्या व्यक्तीने सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुन्हा त्याच ठिकाणी नाल्यामध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तो नाल्यातील बाटल्या स्वतःच्या डोक्यात मारून घेत होता. पुन्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले. अग्निशामक दलाचे जवान अशोक कदम, विकास नाईक, पुंडलिक भुतापल्ले, लक्ष्मण बेदरे आणि राजाराम लांडगे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला नाल्याबाहेर काढले.