“करोनाच्या दुसऱ्या लाटेत अगणित लोकांना जीव गमवावा लागला; जबाबदार कोण?”

नवी दिल्ली – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अगणित लोकांना जीव गमवावा लागला. त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला.

प्रियंका यांनी मोदी सरकारवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवणारी पोस्ट फेसबुकवरून प्रसिद्ध केली. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जनतेला रूग्णालयांचे बेड, औषधे, ऑक्‍सिजन आणि लस मिळवण्यासाठी झगडावे लागले. आपला जीव वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, सरकार मूक दर्शकाच्या भूमिकेत शिरले. त्यातून देशात यातनादायी स्थिती निर्माण झाली.

लस आणि ऑक्‍सिजनची निर्यात, लोकसंख्येच्या तुलनेत अतिशय कमी आणि विलंबाने लसींची ऑर्डर यांसारख्या कृतींमधून सरकारचा बेजबाबदारपणा समोर आला. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम किती घातक होता ते दगावलेल्यांच्या संख्येवरून सूचित होते. जगातील सर्वांत मोठ्या लस आणि ऑक्‍सिजन उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

आपल्या देशाचे डॉक्‍टर जगप्रसिद्ध आहेत. तसे असूनही आपण सध्याच्या स्थितीत कसे काय पोहचलो? त्यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्‍न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिम्मेदार कौन असा सवाल करणारी मोहीम मी राबवणार आहे. त्याअंतर्गत पुढील काही दिवस मी जनतेच्या वतीने सरकारला प्रश्‍न विचारणार आहे, असे प्रियंका यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.