वीस किलोमीटर प्रवासासाठी दोन तासांचा वेळ

न्हावरे-चौफुला रस्त्यावर एक ते दीड फुटांपर्यंत खड्डे ः दुरुस्तीचे काम संथ गतीने

न्हावरे – सावधान.. सावधान.. सावधान… पुढे जाणाऱ्या रस्त्यावर 1 ते दीड फुटापर्यंतचे खोल – खोल खड्डे पडले आहेत. तसेच ठिकठिकाणी रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने ठेकेदाराच्या मनमानीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना खराब रस्त्यामुळे अनेक अपघातही झाले आहेत.

त्याचप्रमाणे, रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे 20 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी दोन तासांपेक्षा अधिकचा वेळही लागू शकतो. अशी अवस्था न्हावरे फाटा – न्हावरे ते चौफुला रस्त्याची झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये कमालीची नाराजी असून, रोज याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व वाहनचालकांनी भीतीमुळे आपला येण्या-जाण्याचा मार्गच बदलला आहे. तसेच या रस्त्यावरील हॉटेल व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना उतरती कळा लागली आहे.

न्हावरा फाटा ते करडे 8 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल ‘पीडब्ल्यूडी’कडे आहे. तर करडे ते न्हावरे सुमारे 10 किलोमीटर रस्त्याचे काम ‘अष्टविनायक महामार्गा’च्या अंतर्गत सात महिन्यांपासून मनमानी पद्धतीने सुरु आहे. न्हावरे ते चौफुला या 25 किलोमीटर रस्त्याच्या कामाला ‘बीओटी’ खाली मुहूर्तच मिळत नसल्याने सुमारे वीस वर्षांपासून रस्ता कामाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे न्हावरा फाटा – न्हावरे ते चौफुला रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याला वाली कोण? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पीडब्ल्यूडी, अष्टविनायक महामार्ग आणि बीओटी या तिन्हीमध्ये अडकलेल्या न्हावरा फाटा – न्हावरे ते चौफुला (केडगाव) रस्त्याचे काय होणार? असा प्रश्‍न परिसरातील नागरीक, प्रवाशी व वाहनचालकांना पडला आहे.

प्रामुख्याने सुरु असलेल्या अष्टविनायक महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहनचालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम करताना टप्पे करून काम करणे आवश्‍यक होते; परंतु तसे न होता ठेकेदाराने करडे ते न्हावरे सलग रस्ता खोदाई केल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करून ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
– अशोक पवार, आमदार शिरूर-हवेली

न्हावरे फाटा – न्हावरे ते चौफुला रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली. त्याचा फटका रस्ता वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्याकडेच्या व्यावसायिकांना उतरती कळा लागली आहे.
– सुभाष कांडगे, भाजप पदाधिकारी व हॉटेल व्यावसायिक

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here