कार्ला – संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोला पकडून 20 किलो गांजासह 6 लाख 50 हजारांचा माल जप्त करण्यात लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश आले आहे. अशोक भूजंग चव्हाण (वय 43, रा. धामणी खालापूर) व शंकर भगवान साळुंखे (वय 30 वर्षे रा. ठोंबरेवाडी लोणावळा) यांना टेम्पोसह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल केतन तळपे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने ग्रे रंगाचा छोटा हत्ती मालवाहतूक टेम्पोमधून (क्र. एमएच 48 सीबी 1828) गांजाची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरसोली गावाच्या हद्दीमध्ये मुंबई पुणे हायवे रोडवर एमएसईबी रेस्ट हाऊस समोर सापळा रचून हा टेम्पो पकडला.
टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 20 किलो गांजा मिळून आला आहे. या टेम्पोमधील लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.