वॉशिंग्टन: अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका लष्करी सहायकाला करोना झाल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प धास्तावले असून त्यांनी आता रोजच करोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि ज्या अधिकाऱ्याला करोना झाला आहे त्याच्याशी आपला फारच कमी संपर्क आला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
माईक पेन्स यांचाही या अधिकाऱ्याशी संपर्क आला आहे. त्यामुळे आम्ही दोघांनीही करोना चाचणी करून घेतली आहे. दोघांचेही रिपोर्ट समाधानकारक आले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तथापि आता दक्षतेचा उपाय म्हणून व्हाईट हाऊसमधील सर्वांनीच आता रोज चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यात माझाही समावेश आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत आम्ही दर आठवड्याला टेस्टींग करून घेत होतो. पण ते पुरेसे नसल्याचे लक्षात आल्याने आता आम्ही रोज हे टेस्टींग करून घेणार आहोत असे ते म्हणाले.