राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

पुणे – राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच या आठवड्यात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.

मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्‍यता आहे विदर्भात सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. या ठिकाणी सर्वच भागांतील दिवसाचे तापमान 40 ते 43 अंश सेल्सिंअसच्या पुढे आहे. मराठवाडयातही सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली,सोलापूर, जळगाव या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. कोकण विभागातील मुंबई, अलिबाग, रत्नागिरी आदी भागांतील तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. पुढील दोन दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार आहे. रात्रीच्या किमान तापमानात मात्र चढ-उतार होण्याची शक्‍यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 8 मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता आहे. 9 मे रोजी प्रामुख्याने विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातही पावसाची हजेरी असेल. 10 आणि 11 मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान पुण्यात ही आज संध्याकाळी गार वारे सुटले होते तसेच आकाशात ढग ही जमा झाले होते पण पावसाने मात्र हुलकावणी दिली. या बदललेल्या वातावरणामुळे संध्याकाळनंतर मात्र हवेत गारवा निर्माण झाला होता तसेच किमान तापमानात ही थोडी घट झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.