वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोलोरॅडो प्रांतातील प्रमुख न्यायालयाने पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीसाठी अपात्र ठरवले आहे. जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेची संसद कॅपिटल हिलमध्ये घुसून धुडगूस घातला गेल्याच्या प्रकरणात ट्रम्प यांचा सहभाग असल्याच्या कारणाने न्यायालयाने ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेरीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत.
पढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत. कोलोरॅडोमधील प्रमुख न्यायालयाच्या निकालाच्याविरोधात ट्रम्प यांच्यावतीने अमेरिकेच्या केंद्रीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले जाणार आहे. कॅपिटल हिलमध्ये ६ जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या धुडगूस प्रकरणात ट्रम्प सहभागी होते, हा सत्र न्यायालयाचा निर्णय कोलोरॅडो न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. प्रांतीय सर्वोच्च न्यायालयाच्या ७ सदस्यीय पिठाने ४ विरुद्ध ३ अशा फरकाने हा निकाल दिला आहे.
मात्र कोलोरॅडो न्यायालयाचा निकाल कोलोरॅडो प्रांताबाहेर अन्य प्रांतांमध्ये लागू होणार नाही. त्यामुळे जरी या निकालाद्वारे ट्रम्प यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवले गेले, तरी ट्रम्प निवडणूक लढवू शकतील. या ऐतिहासिक निकालाला न्यायालयाने ४ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. कोलोरॅडोमध्ये ५ मार्च रोजी प्राथमिक फेरीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी उमेदवारी निश्चित करण्यासाठीची अखेरची मुदत ५ जानेवारी आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या एखाद्या उमेदवाराला यादवी युद्धकालीन कायद्याच्या तरतूदीनुसार अपात्र ठरवले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
१४ व्या घटनादुरुस्तीनुसार कारवाई…
अमेरिकेच्या राज्यघटनेच्या १४ व्या घटनादुरुस्ती अंतर्गत ट्रम्प यांच्यावर हे निर्बंध घातले गेले आहेत. या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेची शपथ घेऊन अधिकाराच्या पदावर असलेली व्यक्ती जर बंडामध्ये सहभागी झाली असेल, तर अशा व्यक्तीला भविष्यात पद स्वीकारण्यास बंदी घातली गेली आहे. कॅपिटल हिलमधील घुसखोरी हे अमेरिकेच्याविरोधात बंड होते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
कॅपिटल हिल प्रकरणामागे ट्रम्प यांचाच हात…
२०२१ च्या निवडणुकीच्या काही महिने आगोदरपासून ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना तयार करून ठेवले होते. २०२१ मध्ये अध्यक्षीय निवडणूकीचा निकाल आपल्याविरोधात जातो आहे, हे लक्षात आल्यावर निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटल हिलमध्ये घुसवून बंड घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. सत्तेचे हस्तांतरण रोखण्यासाठी ट्रम्प यांनीच हे कारस्थान घडवून आणल्याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. असेही न्यायालयाने म्हटले आहे.