थिरूवनंतपूरम – केरळातील त्रावणकोर देवास्वोम बोर्डाने आपल्या अखत्यारीत असलेल्या एका मंदिरात अनुसुचित जमातीच्या एका व्यक्तीला पुजारी म्हणून नियुक्त केले आहे. या बोर्डाच्या अधिपत्त्याखाली दक्षिणेतील सुमारे 1200 मंदिरे आहेत.
बोर्डाने मागास समजल्या जाणाऱ्या जातीतील एकूण 19 जणांना अर्धवेळ पुजारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील एक जण अनुसूचित जमातीचा आहे. त्रावणकोर देवास्मोम बोर्ड ही एक स्वायत्त संस्था अजून तिच्या अखत्यारीत सबरीमला येथील प्रख्यात भगवान अय्यप्पा मंदिरासह अनेक मंदिरे आहेत.
या बोर्डाने प्रथमच अनुसूचित जमातीच्या एका व्यक्तीला मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मंदिरविषयक मंत्रालयाचे मंत्री के सुरेंद्रन यांनी या निर्णयाबद्दल बोर्डाचे अभिनंदन केले आहे. या मंदिरांमध्ये पुजारी म्हणून काम करण्यासाठी एकूण चार जागा आहेत. त्यासाठी केवळ एकच अर्ज आल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या साडे चार वर्षांच्या काळात बोर्डाच्या मंदिरांमध्ये एकूण 133 बिगर ब्राम्हण पुजाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.