मेट्रो प्रकल्प डेअरी फार्म येथील काम अजूनही अपूर्ण
पुणे – शिवाजीनगर येथील मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे काम सुरू आहे. या स्थानकासाठी शिवाजीनगर एस.टी स्थानकाचे स्थलांतर वाकडेवाडी येथील डेअरी फार्म या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात केले जाणार आहे. मात्र, एस.टी स्थानकाचे काम अपूर्ण असल्याने दि.1 ऑक्टोबरला होणारा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र, एस.टी स्थानकाच्या स्थलांतराच्या तारखा सतत बदलत असल्याने प्रवाशांना आणखी काही दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.
मेट्रो मार्गावर शिवाजीनगर एस.टी. स्थानक आवारात मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार आहे. मात्र, एस.टी स्थानकाचे स्थलांतर होण्याआगोदर मेट्रोचे काम सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बसेस बाहेर पडताना इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बस स्थानकाचे तात्पुरते स्थलांतर वाकडेवाडी येथील 5 एकर जागेवर करण्यात येणार आहे. सुरुवातीला स्थानकाचे काम जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले होते. मात्र, ते वेळेत न झाल्याने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. परंतु, या मुदतवाढीनंतर डेअरी फार्म येथील पर्यायी स्थानकाच्या शेडचे काम पूर्ण झाले नाही.
बसेस कोठून सुटणार?
दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी एस.टी.ने जादा बसेस वाकडेवाडी स्थानकातून सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, मागील काही महिन्यापासून बस स्थलांतराच्या तारखा सतत बदलत आहेत. त्यामुळे, दिवाळीच्या सणाला सोडण्यात येणाऱ्या जादा बसेस वाकडेवाडी स्थानकातून सुटणार का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.