पुणे – पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. मतदारसंघातील मतमोजणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन सत्रांत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले.
पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी दि.23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे व बारामती मतदारसंघातील ईव्हीएम मशीन कोरेगाव पार्क येथील शासकीय धान्य गोदामातील स्ट्रॉंग रुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई यांचा यात समावेश राहणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी कशा पद्धतीने कामकाज केले पाहिजे, त्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 236 तर बारामतीसाठी 252 अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि.16 मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे.