निर्णयावेळी सहकार खात्याने दुटप्पीपणा केला

दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा आरोप
पुणे – दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असताना सोसायटीच्या 97 व्या घटना दुरूस्तीनुसार संचालक मंडळाचा विस्तार सिमीत करताना काही संचालकांची नावे वगळावी लागली. याबाबत सहकार खात्याने दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीची बाजू लक्षात न घेता एकतर्फी निर्णय घेत सोसायटीबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे तज्ज्ञ संचालक नागेशकुमार नलावडे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

यावेळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दीपक धुमाळ, ज्येष्ठ संचालक राजेंद्र थोरात, दिलीप जगदाळे, संचालक उमाकांत वालगुडे आणि संचालक पंढरीनाथ शिंदे उपस्थित होते. नलावडे म्हणाले, “दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीने गेली 40 वर्षे सातत्याने ऑडिट वर्ग “अ’ मिळवलेला असून सोसायटीचा “एनपीए’ एक टक्‍क्‍यापेक्षा कमी राहिलेला आहे. असे असताना संचालक मंडळाने त्यांच्या अधिकार कक्षेत मंजूर केलेल्या प्रकरणांबाबत गैरसमज निर्माण करीत सोसायटीमध्ये अनियमितता आहे, सोसायटीमध्ये भ्रष्टाचार होत आहे, असे बिनबुडाचे आरोप करीत माध्यमांमध्ये चुकीचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे सोसायटीच्या विश्‍वासार्हतेला तडा जाऊन सोसायटीच्या ठेवींवर विपरीत परिणाम होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले.

सहकार खाते आणि सोसायटीचे सभासद गणेश तिखे यांच्या विरोधात कोर्टात खटले दाखल करण्यात आले असून त्याबाबत सोसायटी न्यायालयीन लढा लढत आहे. वेळ पडल्यास सहकार खात्याविरोधात रस्त्यावर उतरून सोसायटी बाबत आकस बाळगून कागदी घोडे नाचविणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात सहकार खात्याच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील यावेळी आला.

दि पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पुणे येथे सदाशिव पेठ, शिवाजीनगर तसेच औरंगाबाद आणि कल्याण येथे शाखा असून सांताक्रुझ येथेही आता नवीन शाखा सुरू होत आहे. संस्थेची म्हाळुंगे येथे 36 हजार चौरस फुटांच्या जागेवर बहुद्देशीय इमारत आहे. असे असताना सोसायटीबाबत वस्तुस्थितीचा विपर्यास करून सभासदांच्या मनात शंका निर्माण होईल, असे अवास्तव चित्रण निर्माण केले जात आहे.’

Leave A Reply

Your email address will not be published.