Champai Soren Oath Ceremony : झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. यानंतर चंपाई सोरेन यांनी, “गुरुजी आमचे आदर्श आहेत, शपथ घेण्यापूर्वी आम्ही गुरुजी आणि माताजी (रुपी सोरेन) यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य आहे.” असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.
बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी
प्रदेश काँग्रेसचे प्रमुख राजेश ठाकूर यांनी, चंपाई सोरेन यांना त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांचा अवधी देण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. काँग्रेस हा राज्यातील जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीचा मित्रपक्ष आहे. यापूर्वी चंपाई सोरेन यांनी आम्ही एकजूट असल्याचे म्हटले होते. आमची युती मजबूत आहे, ती कोणीही तोडू शकत नाही. असे स्पष्ट केले होते.
हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर समीकरणं बदलली
JMM विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना विनंती केली होती की त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा दावा मान्य करावा कारण राज्यात ‘गोंधळा’ची परिस्थिती आहे. बुधवारी हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात मुख्यमंत्री नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे राजकीय संकट अधिक गडद झाले होते.
दरम्यान, भाजपने या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी, “दोन दिवसांपासून झारखंडमधील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल आणि केंद्रीय नेत्यांविरोधात असभ्य भाषा वापरली आहे. काल पहिले पत्र दिले तेव्हा त्यातही तांत्रिक चुका होत्या. झारखंडमधील हेमंत सोरेनच्या ४ वर्षांच्या काळात अध्याय राहिला आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच अपेक्षा. एक गोष्ट स्पष्ट आहे की चंपाई सोरेन मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी सत्तेची तार सोरेन कुटुंबाकडेच राहणार आहे.